*नागेपल्ली:-* दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी धर्मराव शिक्षण मंडळ संचालित राजे धर्मराव कला व वाणिज्य महाविद्यालय, आलापल्ली येथे नव्याने उभारण्यात आलेल्या स्व. श्रीमंत राजे सत्यवानराव महाराज सभागृह व ग्रीन जिमचे भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे उद्घाटन मा. श्रीमंत राजे अम्ब्रिशराव आत्राम माजी राज्यमंत्री तसेच धर्मराव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने दीपप्रज्वलन व मान्यवरांच्या स्वागताने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने कार्यक्रमाचे वातावरण भारावून गेले.
आपल्या प्रभावी भाषणात मा. श्रीमंत राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सांगितले की,आदिवासी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, हा धर्मराव शिक्षण मंडळाचा प्रमुख उद्देश आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहू. या महाविद्यालयाच्या प्रगतीसोबत आणखी शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना नवी दिशा देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नीरज. टी. खोब्रागडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, या महाविद्यालयाचा विद्यार्थी म्हणून मला अभिमान वाटतो. आज या सभागृहाच्या उद्घाटनाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक नवे विचारपीठ उपलब्ध झाले आहे. या ठिकाणी विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व बौद्धिक उपक्रम घेता येतील.
उद्घाटन सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये अवधेशरावबाबा आत्राम, प्रवीणरावबाबा आत्राम व मुनेश्वर हडपे यांचा समावेश होता. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व महाविद्यालयाच्या पुढील प्रगतीसाठी सहकार्याचे आश्वासन दिले.या प्रसंगी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण रंगले, ज्यात नृत्य, गीत आणि अभिनयातून स्थानिक परंपरा व संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले.समारोपाच्या वेळी सर्व उपस्थित मान्यवर, प्राध्यापक व शिक्षकवर्गाने नव्याने उभारलेल्या सभागृह आणि ग्रीन जिमचे कौतुक केले. या दोन्ही उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना एकाच वेळी शारीरिक तंदुरुस्ती आणि वैचारिक प्रगतीसाठी संधी उपलब्ध होणार आहे.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. सुर सर, सूत्रसंचालन प्रा. अर्चना घसघंटीवार यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. सोनाली गंपावार यांनी केले. या कार्यक्रमाकरिता बहुसंख्य विद्यार्थी शिक्षक कर्मचारी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते तसेच श्री गिरीश मद्देर्लावार, संतोष उरते उपस्थित होते
या कार्यक्रमाने राजे धर्मराव महाविद्यालयाच्या इतिहासात एक नवीन पर्व सुरुवात झाल्याची भावना उपस्थितांमध्ये दिसून आली.