सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक आणि स्त्रीशिक्षणाच्या जननी आहेत. त्यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. अवघ्या लहान वयात त्यांचा विवाह महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. त्या काळात स्त्रियांना शिक्षण घेण्यास मनाई असताना, ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना शिकवले आणि शिक्षिकेचा मान मिळवून दिला.
*स्त्रियांच्या अंधारया जीवनात*
*पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती*
*म्हणून तर आज जगती*
*अमर आहे सावित्री*
*अमर आहे सावित्री*१८४८ साली पुण्यात भिडे वाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू करून सावित्रीबाईंनी स्त्रीशिक्षणाची पायाभरणी केली. समाजातील विरोध, अपमान, शिवीगाळ, अंगावर शेण-दगड फेकले जात असतानाही त्यांनी शिक्षणाचा दिवा विझू दिला नाही. दररोज शाळेत जाताना सोबत एक साडी ठेवून त्या अपमानाला उत्तर देत शिक्षणाचे कार्य अविरत चालू ठेवत.
*स्त्रियांच्या शिक्षणाची खरी*
*सावित्री तूच कैवारी*
*तुझ्यामुळेच शिकते आहे*
*आज प्रत्येक नारी*
सावित्रीबाईंनी केवळ शिक्षणच नाही तर विधवा पुनर्विवाह, बालहत्या प्रतिबंध, अस्पृश्यता निवारण आणि स्त्रीअधिकार यांसाठीही संघर्ष केला.
त्यांनी *‘काव्यफुले’* सारखा ग्रंथ लिहून सामाजिक अन्यायावर प्रहार केला. १८९७ साली प्लेगच्या साथीमध्ये रुग्णांची सेवा करताना स्वतःचे प्राण अर्पण करून त्यांनी मानवतेचा सर्वोच्च आदर्श ठेवला.*सावित्रीबाई फुले यांचे जीवन म्हणजे त्याग, धैर्य आणि परिवर्तनाची प्रेरणा आहे.*
आजही त्या प्रत्येक मुलीला शिकण्याचा हक्क आणि आत्मसन्मानाची जाणीव देतात.*दगड-शेण सहन करूनही झुकली नाही मान, स्त्रीशिक्षणासाठी दिला जीवनाचा दान।*
*अशा थोर समाजसेविका, स्त्रीशिक्षनाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्य विनम्र अभिवादन*





