गडचिरोली जिल्ह्यातील पंचायत समिती धानोरा येथे *मे २०२३ मध्ये बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना अद्यापही त्यांच्या मूळ कार्यालयातून कार्यमुक्त करण्यात आले नसल्याने* गंभीर प्रशासकीय प्रश्न निर्माण झाले आहेत. बदलीचा निर्धारित तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होत असतानाही कर्मचारी रुजू न झाल्यामुळे पंचायत समितीचे कामकाजावर गंभीर परिणाम होत आहेत.
धानोरा पंचायत समितीत अनेक महत्त्वाची पदे रिक्त असल्याने दैनंदिन प्रशासकीय कामकाज, शासकीय योजना राबविणे, लेखा व नोंदणी प्रक्रिया यावर मोठा परिणाम होत आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत असून नागरिकांची कामे वेळेत पूर्ण होऊ शकत नाहीत.
विशेष म्हणजे, पंचायत समिती धानोरा कार्यालयाने यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे वारंवार निवेदने व पत्रव्यवहार करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. *बदली आदेश लागू होऊन तब्बल तीन वर्षे उलटून गेली तरी संबंधित कर्मचारी मूळ कार्यालयातून भारमुक्त न होणे, हे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.*
या पार्श्वभूमीवर पंचायत समिती धानोरा प्रशासनाने जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर करून, मे २०२३ पासून बदली आदेश असलेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करून धानोरा येथे रुजू करण्याची मागणी *आजाद समाज पार्टी* पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे केली आहे.
*लोकहिताच्या दृष्टीने आणि प्रशासन सुरळीत चालण्यासाठी ही कारवाई अत्यंत आवश्यक असून, वरिष्ठ पातळीवरून तातडीचा हस्तक्षेप व्हावा* अशी अपेक्षा पक्षाचे प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम यांनी व्यक्त केली आहे. अन्यथा धानोरा तालुक्यातील नागरिकांना प्रशासनिक अडचणींचा फटका बसत राहील, अशी चिंता व्यक्त होत आहे.





