शुक्रवारी सकाळी अमेरिकेतील टेनेसी शहरात एक शक्तिशाली स्फोट झाला. ग्रामीण लष्करी स्फोटके बनवण्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात अनेक जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अनेक जण बेपत्ता आहेत. अधिकारी आणि रहिवाशांनी सांगितले की, या शक्तिशाली स्फोटामुळे अनेक मैल दूरवर घरे हादरली आणि आपत्कालीन प्रतिसाद पथकांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
हिकमन काउंटी शेरीफ ऑफिसने सांगितले की, नॅशव्हिलपासून सुमारे ९७ किलोमीटर नैऋत्येस असलेल्या बक्सनॉर्ट शहराजवळील अॅक्युरिटी एनर्जेटिक सिस्टम्स येथे हा स्फोट झाला. सोशल मीडिया पोस्टमध्ये, एजन्सीने लोकांना बचाव आणि मदत पथके काम करू शकतील यासाठी त्या भागापासून दूर राहण्याचे आवाहन केले.
हिकमन काउंटी अॅडव्हान्स्ड ईएमटी डेव्हिड स्टीवर्ट यांनी असोसिएटेड प्रेसला दूरध्वनीवरून सांगितले की, स्फोट सुरू असल्याने आपत्कालीन प्रतिसाद पथके अद्याप आत जाऊ शकलेली नाहीत. त्यांनी सांगितले की, यात काही जीवितहानी झाली आहे की नाही याबद्दल त्यांच्याकडे कोणतीही माहिती नाही. तथापि, नंतर अनेक स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत आणि काही बेपत्ता आहेत. शुक्रवारी सकाळी झालेल्या घटनेवर अॅक्युरंट एनर्जेटिक सिस्टम्सने कोणतीही टिप्पणी दिली नाही.